आषाढी एकादशीचे औचित्य साधून, निसर्गाचे संतुलन राखण्याच्या आणि पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या उद्देशाने आसरा फाउंडेशनने शहापूर येथील आजा पर्वत येथे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला. हा उपक्रम आसरा फाउंडेशनच्या सामाजिक कार्यकर्त्या कीर्ती परब आणि इतर प्रतिनिधींच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडला.
यावेळी आसरा फाउंडेशनचे अध्यक्ष मोहन शिरकर यांच्यासह संस्थेच्या प्रतिनिधी कीर्ती परब, तसेच स्थानिक नागरिक विकी हरणे, कथोरे बाबा, हिरामण भोईर, शरद गिरा, अल्पेश देशमुख, दीपा हरड आणि वसंत समोतेर आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी मिळून उत्साहात विविध प्रकारची रोपे लावून या उपक्रमात सहभाग घेतला.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून आसरा फाउंडेशनने पर्यावरणाच्या संवर्धनासाठी समाजाला एकत्र आणण्याचा संदेश दिला. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, भविष्यकाळातही असेच सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबवून निसर्गाचे रक्षण करण्यासाठी आसरा फाउंडेशन प्रयत्नशील राहील.