शहापूर : जागतिक आदिवासी दिनानिमित्त आसरा फाउंडेशनने शहापूर येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणारे विविध कार्यक्रम सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांनी पारंपारिक आदिवासी नृत्य आणि गायनाचे सुंदर प्रदर्शन केले, ज्याला उपस्थितांकडून भरभरून दाद मिळाली.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने आसरा फाउंडेशनच्या सचिव पवित्रा सावंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभे राहून सक्षम कसे बनावे याबद्दल महत्त्वपूर्ण माहिती दिली. तसेच, त्यांनी आदिवासी कला आणि संस्कृतीचे महत्त्व सांगत ती देश-विदेशात पोहोचवण्याचा संदेश दिला.
कार्यक्रमात एस.व्ही.एस कला प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रोफेसर गजानन शेपाळ यांनीही त्यांच्या देश विदेशात ख्याती मिळवलेल्या आदिवासी विद्यार्थांची उदाहरण देत मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, “आदिवासींनी पुढे जाणे कठीण नाही, ते खूप सोपे आहे. त्यांना फक्त योग्य मार्गदर्शन मिळणे महत्त्वाचे आहे. त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांना प्रेरित केले पाहिजे.”
या कार्यक्रमात रक्षाबंधन आणि वृक्षारोपण सुद्धा करण्यात आले.
सदर कार्यक्रमावेळी आसरा मुक्तांगनच्या “प्रकृति और आजादी” ऑगस्ट २०२५ या विशेषांकाच प्रकाशन उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला डॉ. प्रोफेसर गजानन शेपाळ, आंतरराष्ट्रीय जीवन प्रशिक्षक पवित्रा सावंत, आदिवासी कातकरी आश्रम शाळा बाबरे च्या मुख्याध्यापिका आशा रणखांबे, अधीक्षक अंजली बांगर, साकडबाव चे तलाठी रवींद्र मेंगाल, डोळखांब चे तलाठी शरद वाघमारे, ग्रामपंचायत जुनवणी च्या सरपंच रंजना गिरा, आसरा मुक्तांगन च्या प्रकाशक महानंदा शिरकर, पर्यावरण प्रेमी जानू शिंगे, लक्ष्मण चौधरी, साधना चौधरी, दीपाली हरड, आशा गायकवाड, प्रमोद शिंगे, आसरा फाउंडेशन च्या प्रतिनिधी शबाना पटेल, आशिषकुमार आदी मान्यवर उपस्थित होते.
आसरा फाउंडेशनचे प्रतिनिधी पर्यावरण प्रेमी किर्ती परब यांनी सदर कार्यक्रमासाठी विशेष प्रयत्न केले अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष मोहन शिरकर यांनी दिली.